नाशिक: तपोवनातील एकही वृक्ष तोडू देणार नाही- सुनावणीप्रसंगी पर्यावरणप्रेमींचा इशारा !

नाशिक | २५ नोव्हेंबर २०२५: तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपा आयुक्त व वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनिषा खत्री अनुपस्थित राहिल्याने उपस्थित पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दल जोरदार आक्षेप नोंदवत काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

त्यानंतर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि शेकडो पर्यावरणप्रेमी यांनी एकमताने १८३४ वृक्षांच्या तोडीस तीव्र विरोध केला. “एका झाडालाही हात लावू देणार नाही,” असा ठाम संदेश देत वृक्षतोड रोखण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मनपातर्फे वृक्षतोड प्रस्तावावर तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे मनपातर्फे जाहीर करण्यात आले.

पर्यावरणप्रेमींनी गरज पडल्यास न्यायालयातही याचिका दाखल करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील संभाव्य वृक्षतोडीबाबतची ही महत्त्वाची सुनावणी पंचवटीतील पं. पलुस्कर सांस्कृतिक भवन येथे पार पडली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेसाठी विशेष मोहिम

उद्यान अधीक्षक विवेक भदाणे प्रास्ताविक करत असताना माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि रोहन देशपांडे यांनी आयुक्त उपस्थित नसल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. आयुक्तांशिवाय सुनावणी होऊ देणार नाही, असा त्यांचा आग्रह असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र नंतर सुनावणी सुरू करण्यात आली.

या वेळी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते.

तपोवन हा नाशिकचा ‘हिरवा श्वास’ असल्याचे सांगत तेथील प्रत्येक वेल, पक्षी, नैसर्गिक जलस्रोत आणि माती शहराच्या तापमान नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार पर्यावरणप्रेमींनी केला. कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड मान्य करणार नाही, असा ठाम आणि आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक परिक्रमा मार्ग भूसंपादन व मोजणीच्या कार्यवाहीला मान्यता !
⚡ हे ही वाचा:  नाशिक: स्वस्तात फ्लॅट आणि रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास ३ वर्षांची सक्तमजुरी !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here