नाशिक जिल्ह्यात वराहांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिवरची लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२५: जिल्ह्यात वराहांमधील आफ्रिकन स्वाइन फिवर रोगासह अन्य संक्रमक व सांसर्गिक रोगांचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी या आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागास माहिती देणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यामधील महानगर पालिका क्षेत्रामधील वराहांमधील नमुने आफ्रिकन स्वाईन फिवर रोगासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. तिथे या आजाराची लक्षणे दिसून आलेली आहेत. हा आजार संसर्गजन्य आहे. हा आजार जनावरांमध्ये झपाट्याने पसरतो. नाशिक महानगर पालिका क्षेत्रामधील वराहांमध्ये सदरचा आजार अस्तित्वात असल्याची किंवा नजिकच्या भविष्यात या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार वेळेत व परिणामकाररित्या थांबविण्यासाठी वराहपालक, शेतकरी, अन्य कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतींनी या रोग प्रादुर्भावाची माहिती त्वरित नजिकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संस्था प्रमुखास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

तसेच प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमामधील तरतुदीनुसार अधिकार नसताना सदोष लस मात्रा टोचणाऱ्या व्यक्ती, कायद्याशी सुसंगत नाही अशी कृती करणाऱ्या किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांना अडथळा आणणाऱ्या व बाधित वराह किंवा त्यांचे शव, नदी, तलाव, कालवा व इतर पाण्याच्या स्रोतात टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे आदेशही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संबंधीत विभागांनी मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात बाधित क्षेत्राच्या १ किमी परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अफ्रिकन स्वाईन फिवर (ASF) या रोगाचा प्रादु‌र्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे, वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देवून नियंत्रण ठेवावे, तसेच मोकाट पध्दतीने होणारे वराहपालन टाळावे,

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क होऊ देवू नये, वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्टया योग्यरितीने विल्हेवाट लावावी, वराहपालन करणारे पशुपालक, या व्यवसायाशी संबंधित व्यक्ती (उदा. व्यापारी, कसाई, वितरक इ.) यांच्यामध्ये या रोगाविषयी जागरूकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सुचना देणे व सुक्ष्म संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे. पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी पोलीस व तपासणी नाके यांच्याशी समन्वय ठेवुन शेजारील राज्यातील वराहांचा अनधिकृत प्रवेश होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790