सिन्नरला बस थेट फलटावर घुसली; ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तिघे गंभीर… व्हिडीओ बघा…

नाशिक | १९ नोव्हेंबर २०२५: सिन्नर आगारातून देवपूरकडे जाणाऱ्या एसटी बस थेट फलटावर जाऊन दुर्दैवी अपघात झाला. आज सकाळी सुमारे १०.४५ वाजता घडलेल्या या अपघातात दापूर येथील नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आईसह आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १३ सीयू ८२६७ क्रमांकाची ही बस देवपूरसाठी अकरा वाजता सुटणार होती. त्यापूर्वी चालक बस फलटावर उभी करण्यासाठी नेत असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाटावर गेली. त्यावेळी फलटावर गौरी योगेश बोऱ्हाडे (३०), त्यांचा मुलगा आदर्श बोऱ्हाडे (९), तसेच विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव आणि ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव (रहिवासी तामकटवाडी) यांच्यासह काही प्रवासी उभे होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

अपघातात गौरी बोऱ्हाडे, विठाबाई भालेराव आणि ज्ञानेश्वर भालेराव हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आदर्श बोऱ्हाडेचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: उद्योजकांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याला अटक !

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, संतापलेल्या नातेवाईकांनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बालकाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here