
नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२५: जेल रोड–शिवाजीनगर परिसरातील दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा पर्दाफाश करत नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने तीन युवक आणि दोन अल्पवयीनांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून कोयते, तलवारीसह विविध घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास सात ते आठ जणांनी चेहऱ्यावर मास्क घालून म्हसोबा मंदिराजवळ हातात हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली होती. त्यांनी परिसरातील वाहनांचे नुकसान केले तसेच वाद निर्माण करून विक्रेता धनंजय सागवान (१८) आणि त्याचा मित्र तेजस ऊर्फ विकी यांना मारहाण करत जबरदस्तीने लूट केल्याची तक्रार दाखल झाली होती.
या प्रकरणातील आरोपी साईनाथनगर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळताच हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर आणि रोहित शिंदे यांनी तातडीने कारवाई करत रिक्षातून जाऊन सापळा लावला. पोलिसांनी संशयित राकेश ऊर्फ राका संपत लोंढे, प्रज्ज्वल ऊर्फ पज्या सुरेश गुंजाळ, प्रथमेश ऊर्फ नन्या राजाराम शेलार आणि दोघा अल्पवयीनांना अटक करण्यात यश मिळवले. गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
![]()
