नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२५: शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी वनविभागाचे बचाव पथक तसेच पोलीस दाखल झाले आहेत.
बिबट्याबद्दल माहिती मिळताच पथकाने परिसरात ड्रोनच्या साहाय्यानेसुद्धा शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रशासनाशी चर्चा करून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचे दुपारचे सत्र रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना सुखरूपरीत्या शाळेमध्येच ठेवण्यात आले असून, शाळेचे सर्व लोखंडी दरवाजे बंद करून कुठलही विद्यार्थी वर्गातून बाहेर जाणार नाही याची दक्षता शाळा प्रशासनाने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन पूर्णपणे काळजी घेत आहे. दुपारी जशा सूचना मिळतील तशा सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनच विद्यार्थ्यांना बस किंवा व्हॅनमध्ये सोडण्यात येईल, असे शाळा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
तर वनविभागाचे अधिकारी, पोलीस आणि शाळा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागासह रेस्क्यू टीमचे पथक दाखल झाले आहेत.
👉 Follow Up News Update: नाशिक: भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचा वनविभागाचा दावा
![]()
