शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा 2025-26 चे उद्घाटन

नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२५: शालेय जीवनापासून खेळांची आवड असलेल्या विद्यार्थी खेळाडूंनी आपले नैपुण्य दाखवत यश संपादन केल्यास त्यांना भविष्यात विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी सांघिक व समर्पित भावनेतून पुढे जात यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2025-26 च्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार्थी अशोक दुधारे, जिल्हा क्रीडा अधिकारी (जळगाव) तथा विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र नाईक, ऑलिम्पियन दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी संजीवनी जाधव, अविनाश टिळे, सर्वेश देशमुख, शिवप्रसाद घोडके, निवड समिती सदस्य राजेंद्र साप्ते, श्वेता गवळी, निकिता पवार, प्रिती करवा, दिगंबर वेरणेकर, महेश पलांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू भूमिका नेहते, रेश्मा राठोड, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे मंदार देशमुख, उमेश आटवणे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे राजेंद्र वानखेडे यांच्यासह क्रीडा अधिकारी, क्रीडा शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, देशी खेळांना अधिक प्राधान्य देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. खेळाडूंना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मैदानी खेळांसोबतच इन-डोअर खेळांसाठी क्रीडा सभागृह उभारणे आवश्यक आहे. क्रीडा विभागाने यासाठीचा प्रस्ताव तयार करून सादर करावा. तसेच नाशिक येथील खेळाडूंच्या वसतिगृहाच्या दुरूस्तीसाठी आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ॲड. कोकाटे यांनी दिल्या.
खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना निवासी प्रशिक्षण दिले जाते व त्यातून उत्तम खेळाडू तयार होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी चांगला सराव व उत्तम खेळातून पुढे जात आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील खेळांत सहभाग नोंदवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मंत्री ॲड. कोकाटे यांनी विद्यार्थी खेळाडूंना दिल्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी 92 खेळ प्रकरांच्या स्पर्धांचे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजन केल्या जातात. 19 वर्षाआतील मुले व मुली खेळाडुंच्या खो- खो क्रीडा स्पर्धा 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होत आहेत. या स्पर्धांमध्ये प्रत्येक विभागातून प्रत्येकी 30 खेळाडूंचा संघ व निवड चाचणीसाठीचे खेळाडू मुले व मुली आणि 8 विभागातून एकूण 340 खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या संघास अनुक्रमे रूपये 5 हजार, 3 हजार व 2 हजार रोख व पारितोषिक नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या वतीने दिले जाणार आहे. यासह स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणारअसल्याचे उपसंचालक श्रीमती साळुंखे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2025-26 चे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी आभार मानले.
![]()
