नाशिक: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास पाच तासांत अटक

निफाड। दीपक श्रीवास्तव, दि. १४ नोव्हेंबर २०२५: निफाड शहरापासून जेमतेम पाच किलोमिटर अंतरावरील नांदूर्डी शिवारात नळावर पाणी भरणाऱ्या महिलेला पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करीत गळ्यातील सोन्याचे मणी मंगळ सूत्र असलेली पोत ओरबाडून पळ काढणाऱ्या चोरट्यास अवघ्या पाच तासात जेरबंद करण्यात निफाड पोलिस पथका ने यश मिळवले.

याबाबत निफाड पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील नांदूर्डी येथे फिर्यादी महिला नळाचे पाणी भरत असताना मोटरसायकल वरून आलेल्या अनोळखी इसमाने या महिलेकडे पिण्याचे पाणी मागण्याचा बहाना करीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र वाट्याची व डोरल्याची व सोन्याचे मणी असलेली पोत हिसकावून घेऊन मोटरसायकलवर बसून पलायन केले होते.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

याबाबत निफाड पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेने तक्रार दाखल केली होती. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनिरीक्षक विजय गायकवाड, पोलीस निरीक्षक विश्वनाथ निकम , हवालदार अनिल शेरेकर, भास्कर पवार , नाईक नितीन सांगळे, शिपाई विनोद जाधव, राजू दरोडे, धनंजय जाधव, सिद्धार्थ वाघ, महिला पोलीस नाईक ललिता कोकणे ,महिला पोलिस हवालदार पूनम शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील तसेच निफाड शहरातील सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासणी केली.

🔎 हे वाचलं का?:  सलग चार दिवस बँका बंद राहणार का ? जाणून घ्या सविस्तर…

आणि तपासानंतर संशयित इसम सचिन सुदाम ढेपले रा. निफाड यास ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने सदर गुन्हा केल्याचे मान्य केले. तपासादरम्यान गुन्ह्याचे वेळी सी.सी.टि.व्ही मध्ये दिसणारे आरोपीने वापरलेले कपडे ,जबरी चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल व गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी पोलीसांनी हस्तगत करण्यात यश मिळविले. सदर घटनेतील संशयितास अवघ्या 5 तासातच जेरबंद केल्याने निफाड पोलिसांचे कौतुक होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790