नाशिक | दि. २ नोव्हेंबर २०२५: सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी २४ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय निवृत्त व्यक्तीशी संशयित महिला अंजली मेहता हिने जून महिन्यात संपर्क साधला. ती स्वतःला एका नामांकित गुंतवणूक कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगत होती. संवाद वाढवत तिने आणि तिच्या काही साथीदारांनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.
या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादीने संशयितांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास सुरुवात केली. ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत त्यांनी सुमारे २ कोटी २४ लाख ९३ हजार रुपये गुंतवले. परंतु अपेक्षित नफा न मिळाल्याने संशय निर्माण झाला. शेवटी फसवणूक झाल्याची जाणीव होताच फिर्यादीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
सायबर पोलिसांनी अंजली मेहता, तिचे अनोळखी साथीदार तसेच विविध बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वांगीण तपास सुरु असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
![]()


