नाशिक। दि. २४ सप्टेंबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा): जागतिक पर्यटन दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्था (UNWTO) या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे या वर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन’ घोषित करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालय उपसंचालक कार्यालयाकडून जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी या कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालनालाचे उपसंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वारसा स्थळ पदयात्रा- हेरिटेज वॉक, सांस्कृतिक कार्यक्रम, जागतिक पर्यटन स्थळांना भेटी देणारी पर्यटन सायकल रॅली व गोदा आरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहेत आयोजित कार्यक्रम:
- शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता वारसा स्थळ पदयात्रेचे आयोजन केले असून यात गोदाघाट व पंचवटी या स्थळांना भेट दिली जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता गोल्फ क्लब मैदान येथे पर्यटन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता गोदाघाट, रामकुंड येथे गोदा आरती होणार आहे.
![]()

