नाशिक। दि. ५ जुलै २०२५: गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु आता राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे.
मुसळधार पावसाचा अंदाज:
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातील पावसाने ओढ दिला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात पावसाची तूट असताना जुलै महिन्यात पाऊस सक्रीय झाला आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
चार दिवस पाऊस सक्रीय असणार:
राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे.