नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दोन महिन्याच्या कालावधीनंतर नाशिक मध्ये जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा संकलन आणि प्लाझ्मा उपचार पद्धतीला आज (दि.२४) पासून प्रारंभ करण्यात येणार आहे. सदर उपचार पद्धतीत जिल्हा शासकीय रुग्णालयात महिनाभरापूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांचे रक्त आणि प्लाझ्मा संकलित करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून संकलन आणि उपचार पद्धतीला अखेर प्रारंभ झाला आहे.
जुलै महिन्यातच प्लाझ्मासाठीचे मशीन आरोग्य विभाग प्रशासनालाकडून मिळणार होते. मात्र, ते मशीन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये आले. परंतु, त्या मशीन मध्ये बिघाड असल्याकारणाने संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली. प्लाझ्मा उपचार पद्धती मध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह होते पण आता बरे होऊन त्यांना एक महिना झाला आहे अशा नागरिकांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहन करण्यात येईल. जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह होऊन गेलेल्या रुग्णांचे प्लाझ्मा संकलनावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाच्या उपचाराबरोबरच ज्या रुग्णांना प्लाझ्मा उपचार पद्धतीची गरज आहे. त्यांच्यावर या पद्धतीद्वारे उपचार करण्यात येणार आहे. प्लाझ्मा उपचार पद्धती करण्यापूर्वी समोरील व्यक्ती कोरनामुक्त आहे की नाही याची खात्री करून घेतली जाणार आहे. तसेच रक्त देताना प्राथमिक नियमांची अंमलबजावणी करून संबंधित चाचण्या केल्या जाणार आहेत. बऱ्याच दिरंगाई नंतर अखेर प्लाझ्मा थेरेपीला आजपासून सुरुवात झाल्याने समाधानकारक वाटत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. प्रतिभा पगार यांनी सांगितले.