नाशिक: फुड अ‍ॅण्ड ड्रग्स अधिकारी असल्याचे भासवून ट्रक अडवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक !

नाशिक (प्रतिनिधी): फूड अ‍ॅण्ड ड्रग्सचे अधिकारी असल्याचे भासवून ट्रक अडवून लुटणाऱ्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 4.92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?:
११ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास येवला टोलनाक्यावर चार अनोळखी इसमांनी दोन सुपारीने भरलेले ट्रक अडवले. स्वत:ला फूड अ‍ॅण्ड ड्रग्सचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी ट्रक जबरदस्तीने सातपूरमधील उद्योग भवन येथे नेले. चालकांकडील मोबाईल फोन, पैसे, गाड्यांच्या चाव्या आणि कागदपत्रेही लुटण्यात आली. या घटनेनंतर मनिशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जात पडताळणीची 4 जुलैपर्यंत विशेष मोहीम

पोलिसांचा तपास आणि सापळा:
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ कडे सोपवण्यात आला. पोलीस अंमलदार नितीन जगताप व राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी स्विफ्ट कारने अंबड लिंक रोडने जात आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सापळा रचून गरवारे पॉइंटजवळ कार क्रमांक MH 15 CD 7774 सह दोन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी:
👉 चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर (वय ३७), रा. अशोका मार्ग, आदित्यनगर, नाशिक
👉 मयुर अशोक दिवटे (वय ३२), रा. बुधवार पेठ, भद्रकाली, नाशिक

👉 हे ही वाचा:  नाशिक: १० लाखांच्या रोख रकमेसह फरार झालेला ड्रायव्हर त्याच्या साथीदारासह गजाआड !

त्यांच्याकडून लुट करण्यात वापरलेली कार, मोबाईल, गाड्यांचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मालाच्या पावत्या असा एकूण ₹4,92,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिसरा आरोपीही अटकेत:
तपासदरम्यान आणखी एका आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी टिळकवाडी सिग्नलजवळ सापळा रचून नवीन सोनवणे (वय ३५), रा. न्यू मैत्रीय सोसायटी, इंदिरानगर, नाशिक यालाही अटक केली. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास अधिक गतीने सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव पोलीस, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार रमेश कोळी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार नितीन जगताप, राम बर्डे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे, चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या जया तारडे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790