नाशिक (प्रतिनिधी): मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला पोलिस असल्याचे सांगितले. पुढे लूट झाली आहे, त्यामुळे चेन आणि अंगठी काढून ठेवा, असे म्हणत हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबवत गंडा घातल्याचा प्रकार इंदिरानगर येथे घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि धोंगडे (रा. राजीवनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉक करत असताना अदित्य हॉल येथे आले. दोन अनोळखी इसम दुचाकीने जवळ आले. ‘आम्ही पोलिस आहोत. या परिसरात लुटीच्या घटना घडत आहेत. तुम्ही सोन्याची चेन, अंगठी का घालून फिरता. यामुळेच लूट होते’ असे म्हणत आम्ही येथे गस्त घालत आहोत, चेन आणि अंगठी काढून ठेवा, असे सांगितले. धोंगडे यांनी चेन व अंगठी काढून रुमालात ठेवत असतांना संशयितांनी मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने ते काढून घेतले. धोंगडे घरी गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे तपास करत आहेत.