नाशिक (प्रतिनिधी): मित्राची दुचाकी अडवून कोयत्याचा धाक दाखवत बळजबरीने ऑनलाइन २ हजार रुपये घेत आणखी रक्कम मागितली. पैसे नसल्याचे सांगत जीव वाचवण्यासाठी पळून गेलेल्या मित्राची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार हनुमाननगर, ध्रुवनगर, गंगापूररोड येथे घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांना फाशीच्या डोंगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
कार्तिक मोहिते (२७, रा. गंगापूररोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी ७.३० वाजता मित्र शुभम तुपलोंढे (रा. गंगापूर) याच्यासोबत एमएच १५ जेएन ३४८३ या क्रमांकाच्या दुचाकीने जाताना गंगापूररोडवरील ध्रुवनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर संशयित राहुल जाधव, महेश शिंदे, अरबाज शेख आणि एक अनोळखी तरुणाने कार्तिक मोहिते यांची दुचाकी आडवली.
कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. मोहितेंनी भीतीपोटी ऑनलाइन दोन हजार रुपये संशयितांच्या खात्यात जमा केले. संशयितांनी आणखी रक्कम मागितली असता नकार दिल्याने दोघा मित्रांनी मारहाण केली. कशी तरी सुटका करत दोघांनी पळ काढला. संशयितांना राग आल्याने मोहिते यांची दुचाकी पेटवून देत नुकसान केले. गंगापूर पोलिसांना कळवले. काही वेळात पथक दाखल झाले. संशयितांच्या वर्णनाच्या आधारे फाशीचा डोंगर परिसरात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघे फरार आहे. वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांचे पथक शोध घेत आहे.
![]()


