नाशिक (दि. ९ एप्रिल २०२५, प्रतिनिधी): हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी (दि.८) शहरात उन्हाच्या अति तीव्र झळांनी नाशिककरांना अक्षरशः जणू भाजून काढले. तापमानाचा पारा थेट ४१ अंशांपर्यंत जाऊन भिडला. या हंगामातील ही सर्वांत उच्चांकी नोंद ठरली. बुधवारीही (दि.९) उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मंगळवारी (दि.८) तापमान ४१ अंशावर गेले होते. जिल्ह्यात सर्वाधिक ४२.६ तापमान मालेगावी नोंदवले गेले. निफाडलाही पारा ४२ अंशावर होता. राज्यात सर्वाधिक ४४.१ तापमान अकोल्यात नोंदवले गेले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बुधवारीही (दि.९) उष्णतेची लाट राहणार असून दोन दिवसांनंतर पारा उतरण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. नाशिक मध्ये गत तीन दिवसांपासून उष्ण व दमट वातावरण तयार झाल्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. मंगळवारपेक्षा किमान आणि कमाल तापमानात १ अंशाने वाढ झाली.
गत दशकानंतर प्रथमच उच्चांक:
सलग दोन दिवस नाशिकमध्ये कमाल तापमान एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात चाळिशीच्या पुढे स्थिरावण्याची ही मागील दहा ते बारा वर्षांत पहिलीच वेळ आहे. यामुळे यंदा उन्हाचा कडाका अधिक असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. योगायोग म्हणजे पुढील कुंभमेळ्याच्या दोन वर्ष आधी पुन्हा एकदा कमाल तापमानाचा उच्चांक मोडीत निघाला आहे.
![]()


