नाशिक (प्रतिनिधी): पिझ्झा देण्यास उशीर झाल्याच्या कारणातून एका ग्राहकाने म्हसरूळच्या डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी दुपारी ३ वाजता दिंडोरी रोडवरील एका रेस्तरॉमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना २४ तासांत अटक केली आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि दादाजी मोहिते यांच्या तक्रारीनुसार, दिंडोरी रोडवर डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंट आहे. दुपारी ३ वाजता संशयित सूरज फड (रा. म्हसरूळ) व त्याचा एक साथीदार रेस्टॉरंटमध्ये आले. आम्हाला लवकर पिझ्झा द्या असे सांगितले. मोहिते यांनी गर्दी आहे थोडे थांबावे लागेल. असे सांगितले. याचा राग आल्याने संशयिताने मोहिते यांच्या तोंडावर फाइट मारली. काउंटरवर ठेवलेले संगणक, आणि काउंटरवर ठेवलेला पिझ्झा मेकर गौरी या महिलेला मारुन फेकला. डिलिव्हरी बॉय मनोज पवार यास मारहाण करत प्रिंटर, एलइडी टिव्ही व अन्य वस्तूंची तोडफोड करुन फरार झाला.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, मनोहर क्षीरसागर हे आरोपींची माहिती घेत असतांना त्यांना हा गुन्हा संशयित सुरज बाळासाहेब फड, नीरज दीपक खैरनार आणि साहिल कैलास गायकवाड (सर्व राहणार: स्नेह नगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यांनी केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सूत्र फिरवत तिघांनाही २४ तासांत अटक केली.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक दिपक पटारे, मनोहर क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक जोशी, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतिष वसावे, प्रशांत वालझाडे, पोलीस अंमलदार प्रशांत देवरे, गुणवंत गायकवाड, जितू शिंदे, प्रमोद गायकवाड, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कातकाडे यांनी केली आहे.