नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आधार इ-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखविले आणि त्यानंतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचे करंट अकाऊंट वापरण्यासाठी गळ घालून नाशिकच्या संशयित भामट्याने ठाण्यातील युवकाला तब्बल ३ कोटी ४१ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल पवार (रा. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. स्वप्निल बनसोडे (रा. बदलापूर, ठाणे) या युवकाच्या फिर्यादीनुसार, त्यांचे बदलापूर येथे आधार इ-सेवा केंद्र आहे. गेल्या २ तारखेला संशयित अनिल पवार याची नांदूर नाका येथील प्रेस्टिज हॉटेल याठिकाणी स्वप्निलची भेट झाली होती. स्वप्निल या इ-सेवा केंद्रासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी संशयित पवार याने त्यास ७ लाख रुपये मदत करण्याचे आमिष दाखविले. परंतु त्यासाठी त्याने स्वप्निलच्या बँकेच्या करंट खात्यावरून काही आर्थिक व्यवहार करण्याची अट घातली होती. स्वप्निल यांचा संशयितावर विश्वास बसल्याने त्यांनी संशयिताची अट मान्य केली.
त्यानंतर संशयिताने स्वप्निल यांचे बदलापूर येथील आयसीआयसीआय बँकेचे खाते, त्या खाते क्रमांकाचे एटीएम कार्ड, त्या कार्डशी लिंक असलेले मोबाईल सीम आणि पीन क्रमांक असे सारी माहिती घेतली. या साऱ्यांचा वापर करीत संशयिताने स्वप्निलच्या बँकेच्या करंट खात्यावरून तब्बल ३ कोटी ४१ लाख २६ हजार ५७६ रुपयांचे गैरव्यवहार केले.
हे करीत असताना त्याने ओव्हर ड्राफ्ट सुविधाचाही वापर केला. त्यामुळे स्वप्निलच्या बँक स्टेटमेंटनुसार ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांची वजा शिल्लक केली आहे. त्यामुळे स्वप्निलचे खाते बँकेने गोठविले आहे. अशाप्रकारे संशयित पवार याने स्वप्निलची साडेतीन कोटींचा गंडा घालून पसार झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे हे तपास करीत आहेत.