नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नातलग असलेल्या परप्रांतियांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या दहा वर्षीय मुलाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे.
रमेश साह (रा. सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. तर, अभिषेक अच्छेलाल साह (१०, रा. सिन्नर) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रमेश साह आणि मयत मुलाचे वडील अच्छेलाल साह हे मूळचे बिहारचे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. साह हे एमआयडीसीतील भगवती स्टील कारखान्यात कामाला आहेत.
या दोघांमध्ये काही कारणावरून दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग संशयित रमेश याच्या मनात होता. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तो बिहार येथे गेला होता. बिहारहून परतताच, संशयित रमेश साह याने अच्छेलाल साह यांच्या १० वर्षांच्या अभिषेकचा शुक्रवारी (ता.१०) खून केला. अभिषेकचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह खंडेराव मंदिराजवळील झाडाझुडपांत फेकून दिला होता. अभिषेकचा एक हात तोडलेला तर पोटावर चाकूचे वार होते.
अभिषेक बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिसांत केलेली होती. निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे, निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान शिंदे, योगेश शिंदे, प्रकाश उंबरकर, प्रशांत सहाणे आदींचे पथक शोध घेत होते. अभिषेकचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुन्ह्याची उकल करीत पोलिसांनी संशयितास अटक केली. पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्यासह पथक घटनेचा तपास करीत आहेत.