नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 3 मार्च, 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 11 हजार 443 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 79 कोटी 89 लाख 12 हजार 908 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड
एका मोटार अपघात प्रकरणात 40 लाख रूपयांची तडजोड
मोटार अपघात प्रकरणात 2021 साली मोटार सायकल व ट्रक मध्ये नाशिक-दिंडोरी रोड, वाढणे फार्म, म्हसरूळ शिवार येथे अपघात झाला होता. या अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे वय 29 वर्षे होते. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये 40 लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली.
144 मोटार अपघात प्रकरणांमध्ये 9 कोटी 50 लाख 93 हजार रूपयांची मिळाली नुकसान भरपाई:
मोटार अपघात प्रकरणांमध्ये लोकअदालतीत एकूण 928 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील 144 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यात वेगवेगळ्या अपघाताध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी व मयत झालेल्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळणासाठी प्रकरणे दाखल केले होते. यात तडजोडीअंती एकूण 9 कोटी 50 लाख 93 हजार रूपयांची भरपाई होवून पक्षकांरांनी समाधान व्यक्त केले.
मोटार वाहन चालकांना दिलासा:
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 1 हजार 687 मोटार वाहन प्रकरणामध्ये 121 प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.
कौटुंबिक वादविवाद असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड:
लोकअदालतील एकूण 75 कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यामुळे सर्व 75 प्रकरणांमधील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. तसेच सर्व प्रकरणांमध्ये एकूण 150 कुटुंबांना संबंध पूर्ववत झाल्याने समाधान मिळाले.
निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात:
- परक्राम्य संलेख अधिनियम, कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 614 प्रकरणे
- मोटार अपघात प्रकरणे- 144 प्रकरणे
- कामगार विषयक- 14 प्रकरणे
- कौटुंबिक वादातील प्रकरणे- 75 प्रकरणे
- फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 344 प्रकरणे
- इतर – 1060 प्रकरणे
दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख 95 हजार 451 इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 11 हजार 192 प्रकरणे निकाली निघाली असून रूपये 11 कोटी 89 लाख 98 हजार 178 रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी इंदलकर यांनी दिली आहे.