कामात कसूर, दिरंगाई केल्याप्रकरणी कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन हे कार्यालयीन वेळेत येऊन काम करत नसल्याचे लक्षात आल्यामुळे वैद्यकीय विभागाने ६२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच यापुढे विनापरवानगी गैरहजर आढळल्यास बेट सेवा समाप्त करण्याचा इशाराच वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे.
शहरात महापालिकेचे ५ रुग्णालये महत्त्वाची ठरतात. त्यात बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गर्दी असते. येथील ६२ कर्मचारी हे विनापरवानगी गैरहजर राहणे, कामावर वेळेवर न येणे, ऑनलाइन हजेरी भरत नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
२१ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंतच्या हजेरी अहवालात ६२ जण त्याचे पालन करत नसल्यामुळे त्यांची वेतन कपात करण्यात आली असून यापुढे विनापरवानगी गैरहजर आढळल्यास थेट सेवा समाप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.