नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): येत्या लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील मतदारांना घरूनच टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी दिव्यांगांसाठीच ही सुविधा होती. मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने प्रत्येक मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पूर्ण सज्ज राहाण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन जाणून घेतले.
लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघांचे अधिकारी अर्थात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांची बैठक शर्मा यांनी घेतली. त्यामध्ये निवडणूक जाहीर होण्यापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंत सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन कसे कराल, याची चाचपणी केली.
तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदार यादी तयारी, स्ट्रॉंगरुम, मतदान यंत्र, साहित्य वितरण, मतदानानंतर केंद्रीय वेअर हाऊसमध्ये मतदान यंत्र सुरक्षितपणे जमा करण्याची व्यवस्था, अशा सर्वच बाबींच्या नियोजनाचीही माहिती शर्मा यांनी घेतली.
वयस्कर व्यक्तींना घरूनच मतदानामुळे आता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. अशा मतदारांना शोधून निवडणुकीच्या दिवशी त्यांना सुविधा द्यावी, एकही मतदार मतदानापासून वंचित राहाता कामा नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.