नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी (ता. २७) रात्री एका पाठोपाठ दोन सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्यानंतर, रविवारी (ता. २८) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला.
एरवी चोरटे दुचाकीवरून सोन्याची पोत खेचतात. परंतु या घटनेत संशयितांनी कारचा वापर केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया वसंत काटे (५४, रा. चरणदास मार्केटच्या मागे, जेलरोड) या रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. दसककडे जाणार्या मार्गांवर त्या नेहमीप्रमाणे पायी जात असताना, एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली.
कारमधील अज्ञात संशयिताने त्यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले. पत्ता विचारण्यात गुंतवून ठेवत कारमधील संशयिताने संधी साधत त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून कारमधून नाशिकरोडच्या दिशेने पोबारा केला.
सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, इंदिरानगर परिसरामध्ये शनिवारी (ता.२८) दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर रविवारच्या या घटनेमध्ये संशयितांनी कारचा वापर केला आहे. नाशिकरोड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.