नाशिक: डेंग्यूमुळे कर्मयोगीनगरमध्ये एकाचा मृत्यू… सत्कार्य फाऊंडेशनचा आंदोलनाचा इशारा !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर, तिडकेनगरसह प्रभाग २४ मध्ये डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. घरोघरी रुग्ण तापाने फणफणले आहेत. कर्मयोगीनगरमध्ये एका रहिवाशाचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नागरिकांच्या आरोग्याचे, जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रभागात डास निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबवावी. सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देवून आवश्यक उपाययोजना दोन दिवसात कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे. 

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जुने सिडको, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर यासह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, डेंग्यू, मलेरियासह विविध आजारांनी थैमान घातले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी कर्मयोगीनगरमधील एका रहिवाशाचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूचे रुग्ण पंधरा दिवसात आढळले आहेत. घरोघरी तापाचे रुग्ण आहेत. यापूर्वी सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांना निवेदन दिल्यानंतर बुधवार, २५ ऑक्टोबरपासून डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू झाली आहे. संपूर्ण प्रभागात डास निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

हे ही वाचा:  नाशिक: पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून युवकावर कोयत्याने हल्ला

प्रभागात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते, चिखल, माती व इतर कचर्‍याचे ढिग रस्त्यावर व कडेला साचलेले आहेत. नंदिनी नदीतूनही दुर्गंधी येत आहे. प्रभागात त्वरित स्वच्छता मोहीम राबविण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी द्याव्यात. रस्त्यावर, तसेच रस्त्याच्या, नाल्याच्या कडेला बांधकाम व्यावसायिकांकडून टाकली जाणारी माती, चिखल व इतर मटेरियल याबाबत बांधकाम, नगररचना विभागाला अनेकदा विनंती केली.

मात्र, हे दोन्ही विभाग ही जबाबदारी एकमेकांवर ढकलून अप्रत्यक्षपणे बांधकाम व्यावसायिकांना पाठिशी घालतात, रस्त्यावर माती व कचर्‍याचे ढिग निर्माण करण्यास मोकळीक देतात. नागरिकांचे आरोग्य, तसेच परिसराची स्वच्छता धोक्यात आणण्याचे कर्तव्य ते बजावत आहेत. या संबंधितांनाही योग्य त्या सूचना आयुक्तांनी द्याव्यात. दोन दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, डॉ. शशीकांत मोरे, निलेश ठाकूर, प्रभाकर खैरनार, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, सतीश कुलकर्णी, पोपट तिडके, शिवाजी मेणे, घनश्याम सोनवणे, डॉ. राजाराम चोपडे, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, दीपक दुट्टे, सतीश मणिआर, सचिन राणे, राहुल काळे, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम शिरोडे यांनी दिला आहे. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790