नाशिक: निवडणूक शाखेमार्फत नोव्हेंबर, 2023 मध्ये विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे 27 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच अधिकाधिक नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी नोव्हेंबर, 2023 या महिन्यात विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत नविन पात्र मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरीत मतदार वगळणे, मतदारांच्या तपशीलात बदल करणे या स्वरूपाचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार आहेत.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

या कार्यक्रमांतर्गत शनिवार 4 नोव्हेंबर, रविवार 5 नोव्हेंबर, शनिवार 25 नोव्हेंबर व रविवार 26 नोव्हेंबर, 2023 या चार दिवसांत मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर, 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी कळविले आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हा निवडणुक शाखा व त्याअंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुक शाखा भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांप्रमाणे पूर्व तयारी करीत आहेत.

मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण कार्यक्रम 22 ऑगस्ट ते 09 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबविण्यात आला असून यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार केंद्रांची भौतिक तपासणी करुन मतदारांच्या सोयी सुविधा उपलब्धतेची तपासणी करुन एकूण 156 मतदान केंद्र खोल्यांमध्ये बदल करून नविन केंद्र खोल्या घेतल्या आहेत.

1 हजार 500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघात 8 व येवला विधानसभा मतदारसंघात 1 या प्रमाणे एकूण 9 नविन मतदान केंद्र तयार करण्यात आली असुन दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर मतदारास जावे लागते, अशा दिंडोरी विधानसभा मतदार संघातील पेठ तालुक्यातील दुर्गम भागात 6 नविन मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या प्रकारे नाशिक जिल्ह्यात एकूण 15 नविन मतदान केंद्र मतदारांसाठी निर्माण केली असुन पुर्वीच्या एकूण 4 हजार 724 या मतदान केंद्रांच्या संख्येत भर पडून आता 4 हजार 739 इतकी मतदान केंद्रांची संख्या झाली असल्याचे ही उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी कळविले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here