नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यभर गाजत असलेले नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण गंभीर आहे. अगदी नाशिकमधील शाळांच्या आवारातही ड्रग्ज सहज मिळत आहे. ज्या ड्रग्जमाफियांना अटक झाली आहे, त्यांना वाचविण्यात सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक आमदारांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ड्रग्ज प्रकरणात आमदारांच्या सहभागाचे पुरावे आपल्याकडे असून, येत्या विधिमंडळ अधिवेशनात ते सादर करणार असल्याचा दावाही पटोले यांनी केला.
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीनिमित्त पटोले सोमवारी (ता. ९) नाशिकमध्ये आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सर्व विभागांमध्ये बैठका होत असून, आगामी सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पटोले यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.
नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणी पोलिसांना दोष देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनाच त्यांनी दोषी ठरविले. या प्रकरणात येथील काही स्थानिक आमदारांवरच गंभीर स्वरूपाचे आरोप केले. काँग्रेसच्या ‘नाशिक बचाव’ अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर पटोले यांनी नाशिकचे ड्रग्ज प्रकरणाचे आपल्याकडे सर्व प्रकारचे पुरावे असून, येत्या अधिवेशनात आम्ही हे सगळे पुरावे विधिमंडळात सादर करणार असल्याचे सांगितले.
“नाशिकमधील शाळांमध्येच ड्रग्जचा पुरवठा केला जातो. पाचशे ते सहाशे कोटींचे ड्रग्ज नाशिकमध्ये पकडले जातात. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अपात्रता प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून, सत्तेचा दुरुपयोग हे भाजपचे ब्रीदवाक्य आहे. केंद्राच्या विरोधात जो बोलेल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. राष्ट्रवादीने राज्यात घोटाळे केले, असे आरोप भाजपने केले होते, मग राष्ट्रवादीच्याच आमदारांना मंत्री केले जाते हे कसे?” असेही श्री. पटोले म्हणाले.
टोलमुक्तीला काँग्रेसचा पाठिंबा:
भाजपने २०१४ मध्ये जनतेला टोलमुक्तीचे खोटे स्वप्न दाखवले होते. आमची सत्ता आली, तर आम्ही टोलमुक्त करू, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यातच दिले होते. त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे सांगत टोलमुक्तीला आमचा पाठिंबा असल्याचे पटोले यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या प्रश्नावर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.