नाशिक (प्रतिनिधी): ओझर (ता. निफाड) येथील हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लि. (एचएएल) या संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या विमानांचे सुटे भाग बनविणाऱ्या कंपनीला आता सुखोई-३० एमकेआय या विमानांचे भाग बनविण्याचे महत्त्वाचे काम मिळणार आहे.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत सर्व खरेदी संरक्षण मंत्रालय भारतीय विक्रेत्यांकडून प्रॉक्यूरमेंट श्रेणी अंतर्गत करेल.
माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे नाशिकला लाभलेल्या ‘एचएएल’ या संरक्षण क्षेत्रातील कारखान्याला आता केंद्रातील मोदी सरकारने भारतीय हवाई दलासाठी ज्या १२ सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांची घोषणा केली आहे, ती सर्व विमाने नाशिकमध्ये तयार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हा उपक्रम राबविला जाईल. मुख्य म्हणजे हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात वाढ करण्यासाठी नाशिक शहराचे योगदान लाभत आहे. हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मान्यता दिली.
संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार डिफेन्स एक्विझिशन कौन्सिलने जवळपास ४५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी स्वीकृती आवश्यकता मंजूर केली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेत १५ सप्टेंबरला यासंदर्भात बैठक झाली. त्यात सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून प्रोक्योरमेंट श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.
‘सुखोई’ हे मल्टिरोल लढाऊ विमान!:
‘सुखोई’च्या निर्मितीचा हा प्रकल्प ११ हजार कोटी रुपयांचा असल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत अपघात झालेल्या १२ विमानांची जागा घेण्याचे काम नवे ‘सुखोई’करतील.
हे एक मल्टिरोल लढाऊ विमान असून, यातून हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारे युद्ध लढण्याची क्षमता आहे, असेही संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.