नाशिक (प्रतिनिधी): राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्यसेवेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मिळण्याची सुविधा २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यावरील चालक गेल्या ९ वर्षांपासून अत्यंत कमी पगारावर काम करत आहेत.
वेतन वाढवून मिळत नसल्यामुळे त्यावर त्वरित तोडगा काढावा या मागणीसाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने १ सप्टेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
त्यात राज्यातील १९८०, तर नाशिकमधील १२० चालक सहभागी होणार असल्यामुळे रुग्णसेवा व आरोग्यसेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत. चालक संघटनेने दिलेल्या निवेदनामध्ये, बीव्हीजी कंपनीकडून वाहनचालकांना अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्यमंत्र्यांची भेट निष्फळ:
चालकांच्या संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन वेतनवाढीच्या मागणीचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.