नाशिक (प्रतिनिधी): सेवेवर कार्यरत पोलिसाची कॉलर धरत शिवीगाळ करणाऱ्या संशयित आरोपीस न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सेवेवर कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याची शर्टाची कॉलर धरत शिवीगाळ केल्याची घटना २५ ऑगस्ट २०१५ ला घडली होती.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित आरोपी शंतनू शंकर सोनवणे (रा. तेली गल्ली, जुने नाशिक) याच्याविरुद्ध शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्यामराव अहिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी तपास करीत न्यायालयात पुरावे सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक १) न्या. जी. पी. बावस्कर यांच्या न्यायालयात शुक्रवारी (ता. ११) सुनावणी झाली.
सुनावणीअंती आरोपीस सहा महिन्यांचा कारावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.