पंधरा दिवसांत नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, पालकमंत्री दादा भुसे यांचा मनपाला अल्टिमेटम

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत खड्ड्यांची पाहणी केली.

त्याचबरोबर पाहणीत अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेची कान उघडणी केली. येत्या पंधरा दिवसांत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेला दिला.

नाशिक शहरात पावसाची संततधार नसली तरी यंदाही अनेक भागात रस्ते खड्डेमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे वाहनधारकांची कसरत होत असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरात फेरफटका मारत खड्ड्यांची पाहणी केली. हलक्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

दादा भुसे यांनी विविध रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाला सूचना केल्या. शहरातील ज्या रस्त्यांचे डांबरीकरण गेल्या तीन वर्षात झाले, अशा लायबीलिटी पिरियडमधील रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. तसेच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधितावर आयुक्तांनी कारवाई करावी, शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे येत्या पंधरा दिवसात बुजवून नाशिक खड्डे मुक्त करावे, असा अल्टिमेटम भुसे यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान दोन महिने उलटूनही नाशिक शहरात पावसाचा पत्ता नाही. कशी ऊन तर कधी ढगाळ वातावरण तर कधी हलक्या सरी कोसळत आहे. त्यामानाने मागील वर्षी शहरात तुफान पाऊस बरसत होता. त्यामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत होते. यंदा तर फारसा पाऊस नसूनही अनेक भागात खड्डे पडले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी

त्यातच मनपा प्रशासनाने बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रिट करण्याचा निर्णय घेतला असून अनेक भागात कामही सुरु करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्त्यावर उतरत पाहणी केली. यात अनेक भागातील रस्ते खड्डेमय झाले असून नाशिककरांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. म्हणूनच त्यांनी मनपा प्रशासनाला आगामी पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे अल्टिमेटम दिला आहे.

नाशिकचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार:
नाशिक शहरत सध्या 2300 किलोमीटरचे रस्ते आहेत त्यातील 300 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून टप्या टप्याने सिमेंट काँक्रेटचे रस्ते केले जाणार असून त्यासाठी मनपाच्या बजेटमध्येही तरतूद केली जाणार आहे. काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्याची गती अत्यंत संथ आहे. एक एक वर्ष उलटून जाते तरीही रस्ते होत नसल्यानं परिसरातील नागरिकांना, वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे संथ गतीच्या कामाने होणारा त्रास आणि दुसरीकडे खड्ड्यातून कसरत करत मार्ग काढताना होणारा मनस्ताप असा अशा दुहेरी कात्रीत नाशिककर अडकले असल्यानं आधी खड्डे बुजवून नाशिकराचे हाल कमी करा, अशी मागणी होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790