HomeAd

नाशिक: अपघाताचे कारण सांगून वाहन थांबवत एकास बेदम मारहाण व लूट

नाशिक (प्रतिनिधी): वाहनाचा अपघात झाल्याचे कारण दाखवत एकाला बेदम मारहाण आणि लूटमार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चौघांना ताब्यात घेतली.

रात्री उशिरापर्यंत खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल वसंतराव कोटगिरे (४४, रा. हार्दिक अपार्टमेंट लोखंडे मळा, जेल रोड) हे बुधवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास त्यांच्या कारमधून (एमएच- १५- डीसी- ९४८२) पाथर्डी फाट्यापासून पाथर्डी गावाकडे जात होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: 'चक्र' च्या माध्यमातून संशोधन, नवाचार आणि स्टार्ट अपला बळ मिळेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या वेळी वाहनासोबत अपघात झाल्याच्या कारणावरून शेल पेट्रोलपंपाजवळ चार संशयितांनी त्यांची कार अडवली. आतमध्ये बळजबरीने बसत गौळाणे रोडवरील हॉटेल एसएसके क्लब पुढे नेले. चौघांनीही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

👉 हे ही वाचा:  अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस ५ जूनपर्यंत मुदतवाढ

तसेच खिशातील पाकीट आणि कागदपत्रे काढून घेतले. ५० हजार रुपये दे नाहीतर अजून मारहाण करू, अशी धमकी दिली. त्यानंतर फोन पेद्वारे संशयितांनी २१ हजार रुपये काढून घेतले. सदर प्रकार घडल्यानंतर कोटगिरे यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

इंदिरानगरच्या गुन्हे शोध पथकाने चार तासातच तपास चक्रे फिरवत चारही संशयिताना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणी तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाटील, जावेद खान, सागर परदेशी, विशाल पाठक, मुश्रीफ शेख, श्यामल जोशी, योगेश जाधव यांनी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790