नाशिक (प्रतिनिधी): उपनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे, यासाठी छळ करणाऱ्या संगमनेर स्थित पती, सासू, सासरा व दीरास न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.
उपनगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित विवाहितेचा संगमनेर (जि. नगर) येथील राहुल अशोक यादव यांच्यासोबत विवाह झाला होता.
विवाहानंतर एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१५ या दरम्यान आरोपी पती राहुल याच्यासह सासरे अशोक यादव, सासू आशा यादव व दीर विपुल यादव व आणखीन एका महिलेने छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दिली होती.
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावे, पैसे न आणल्याने आरोपींनी छळ करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
त्यानुसार तत्कालीन उपनगरचे सहायक पोलिस निरीक्षक ए. ए. येवला यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
ॲड. एस. पी. घोडेस्वार यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायाधीश शर्वरी एम. जोशी यांनी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे चौघांना विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व मारहाणप्रकरणी सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार गौरव साळवे यांनी कामकाज पाहिले.