नाशिक: आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती! कर्मचारी वेळेत न आल्याने नातेवाईकांकडून संताप
नाशिक (प्रतिनिधी): सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळीच कक्षात न नेण्यात आल्याने तिने आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.
रविवारची सुटी आणि कमी कर्मचारी असल्याने हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यातील आणि राज्य मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक त्रुटी यानिमित्ताने पुढे आल्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या घटनेनंतर तरी त्यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अधिक माहिती अशी: चितेगाव (ता. निफाड) येथील उस्मान मोतीराम सय्यद यांच्या पत्नी शबाना उस्मान सय्यद प्रसूतीसाठी चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी प्रवेशद्वारी आल्या.
त्यांना प्रसूतीकळा असह्य झाल्याने त्या खाली बसल्या. त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईक व काही नागरिकांनी जोरजोरात आवाज दिला. मात्र तब्बल पंधरा मिनिटे वाट बघूनही कुणीही कर्मचारी खाली न आल्याने गोकुळ टर्ले, राजेंद्र टर्ले, नीलेश नाठे धावतच वरच्या मजल्यावर आले.
तेथे असलेले डॉ. आशिष गायकवाड व परिचारिकांनाही माहिती देत खाली बोलावले. तोपर्यंत प्रसूतीकळा असह्य झालेल्या महिलेने तेथेच बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिला कक्षात नेत तेथे उपचार करण्यात आले. मात्र हा सारा प्रकार व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टाकणारा आहे. येथील आरोग्य केंद्रात मंजूर पदे २९ असताना केवळ १७ पदे भरली आहेत. त्यातच आज रविवार असल्याने बहुतांश कर्मचारी सुटीवर होते.
आरोग्य केंद्रात पाण्याची वाणवा:
गेल्या आठवड्यात १४ शस्रक्रिया व एका प्रसूतीसाठी महिला दाखल असताना तब्बल सहा दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. रुग्णाच्या नातेवाइकांना घरून पाणी आणावे लागत होते, अशी माहितीही एका रुग्णाने दिली.