HomeAd

नाशिक: जिल्ह्यात आणखी 2 कोरोनासदृश्य रुग्ण; त्र्यंबकची महिला कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असला तरी, जेएन-१ हा कोरोनाचा नवीन व्हायरंटचा रुग्ण जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही.

त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह निष्पन्न झाला आहे परंतु प्रकृती स्थिर आहे. तर, सिन्नर तालुक्यातील दोन रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आहे.

कोरोनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर्स सुरू केले आहेत.

त्यानुसार तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याच्या संपर्कातील रुग्णांची स्क्रिनींग करण्याचेही निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील महिला प्रसुतीनंतर कोरोनासदृश्य आढळून आली होती. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाली आहे.

तर तिला जेएन-१ हा कोरोनाचा नवीन व्हायरंटची लागण झाल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तिचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहे. मात्र तिची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील दोन रुग्ण कोरोनासदृश्य आढळून आले आहेत. त्यांची रॅपिट टेस्ट पॉझिटिव्ह असून, आरटीपीसीआरचा अहवाल प्रलंबित आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. यात एक वयोवृद्ध तर दुसरी रुग्ण महिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790