नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या एक टक्के व्याजदराने दोन कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याची बतावणी करीत, संशयिताने वकिलाला १० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबादास सायबू ओरसे (रा. प्रतापसिंह नगर, इंदापूर रोड अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे.
ॲड. विकास थोरात यांच्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये संशयित व ॲड. थोरात यांच्यात भेट झाली होती. अॅड. थोरात यांच्या जिल्हा न्यायालयातील चेंबरमध्ये संशयिताने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
दोन कोटी रूपयांच्या कर्जासाठी एक टक्के व्याजदर असेल असे त्याने सांगितले. त्यामुळे अॅड. थोरात कर्ज घेण्यास तयार झाले. कर्जासाठी लागणारी कागदपत्र संशयिताकडे सुपूर्द करताच त्याने आगाऊ व्याज आणि टीडीएस खर्चाची मागणी केली.
त्यानुसार अॅड. थोरात यांनी गेल्या आठ महिन्यात टप्पा-टप्प्याने दहा लाखाची रोकड संशयिताच्या बँक खात्यात जमा केली.
मात्र अनेक महिने उलटूनही कर्जाची रक्कम पदरात न पडल्याने अॅड. थोरात यांनी संशयिताशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अॅड. थोरात यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.