नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील सातपूर परिसरातील अंबड लिंकरोडवर असलेल्या केवल पार्क येथे रात्री अचानक भीषण आग लागली. ही आग एकाच रांगेत असेलेल्या ८ दुकानांच्या गाळ्यांना लागली असून, यामध्ये ५ दुकाने व गाळ्यांसमोर उभ्या असलेल्या ४ कार जळून खाक झाल्या. या अग्नितांडवात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी (दि.२० डिसेंबर) रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अष्टविनायनगर, केवलपार्क येथे असलेल्या ऑटोमोबाईल दुकान, गॅरेज, हार्डवेअर, पेपर वर्क असलेल्या दुकानांना अचानक आग लागली. यामुळे परिसरात हाहाकार उडाला असून, तातडीने अग्निशामक दलाला कळवण्यात आले. दरम्यान, सातपूर, सिडको, अंबड या औदयोगिक वसाहत व मुख्यालयामधील ५ अग्निशामक बंबांनी वेळीच अथक प्रयत्नाने २ तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत यशवंत ऑटो सेंटर मध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ४ गाड्या (फोरव्हीलर) जळून खाक झाल्या. तर, कल्पतरू हार्डवेअर, एजीके इंटरप्रजेस, ग्लो साइन बोर्ड, ओम आर्ट या दुकानातील पूर्ण साहित्य देखील जळून खाक झाले. तसेच या आगीत ३० ते ३५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले असे सांगण्यात येत आहे. आग कशी लागली याचे स्पष्ट कारण समजले नाही. पण, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.