नाशिक (प्रतिनिधी): संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान उद्या त्रंबकेश्वर येथून होणार आहे. वारकरी संप्रदायमध्ये अतिशय मानाची पालखी म्हणून समजल्या जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान उद्या सरकारने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियम पाळत होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा कोरोनाच्या महामारीमुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यातच दरवर्षी त्रंबकेश्वरहुन निवृत्तिनाथांची पायी पालखी वट पौर्णिमेस पंढरपुरकडे हजारो वारकरी भाविकांसमवेत प्रस्थान करत असते. मात्र यंदा देखील कोरोनाचे सावट असल्याने शासनाने पायी पालखी वारीस बंदी घातली आहे. त्यामुळे उद्या वटपौर्णिमेला पालखी “प्रस्थान सोहळा “मंदिरात मोजक्या भाविकंच्या उपस्थितीत संपन्न होणार असून आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी दोन शिवशाही बसद्वारे पालखीचे पंढरपुरला प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रशासकीय समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
दिंडी चालक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्थान सोहळयाची तयारी पूर्ण झाली असुन, पालखी सोबत चालणाऱ्या ४० दिंडयांचा प्रत्येकी एक प्रातनिधिक प्रतिनिधी प्रस्थान सोहळयास उपस्थित राहणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार कोविड – १९ चे नियम पाळून होणाऱ्या या प्रस्थान सोहळयात पारंपारिक पध्दतीने पूजा-अर्चा होईल..व तसेच पालखी सोहळयाचे मानकरी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प. बाळासाहेब देहुकर, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर आदिंच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्र होणार आहे.