नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत प्रशासनाकडून काही महत्वाच्या प्रवाशी रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांची बाहेरगावी नातेवाईकांकडे तर पर्यटनासाठी गर्दी या रेल्वेगाड्यांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे मुंबईहून नाशिकमार्गे धावणाऱ्या सर्वच रेल्वे हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी शासनाकडून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान लॉकडाउनच्या काळात जागोजागी अडकलेल्या प्रवाश्यांसाठी श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली होती. तर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत स्पेशल ट्रेन व आता दिवाळी निमित्ताने फेस्टिव्हल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. नियमित रेल्वे बंद असल्या तरी या स्पेशल तसेच फेस्टिव्हल ट्रेन सुरु करण्यात आल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत नाही. या गाड्या नाशिकरोड, मनमाड, भुसावळ रेल्वेस्थानकावर थांबतात. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाश्यांना रेल्वेस्थानकावर तसेच ऑनलाईन वेबसाईटवर आरक्षण देखील करता येत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अजुनही कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. तरी देखील प्रवाश्यांकडून सोशल डिस्टिंगसिंगच्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. तसेच या रेल्वे मध्ये प्रवाश्यांची मोठया प्रमाणावर गर्दी वाढल्याने प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.