नाशिकमध्ये कोयता गॅंगचा धिंगाणा: गाड्यांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे सावट…
नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरात भरवस्तीत रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास कोयतागँगने धिंगाणा घातला असून सुमारे वीस ते पंचवीस गाड्यांची तोड फोड केल्याने परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासनाचा गावागुंडांवर वचकच राहिला नसल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पवननगर पोलीस चौकी मागील सूर्यनारायण चौक, रायगड चौक अश्या परिसरात दोन दुचाकीवरील आलेल्या सहा ते सात गावगुंडांनी म्हणजेच कोयतागँग ने त्यांच्या हातातील कोयते, धारदार शत्रे व लाकडी दांड्यांच्या सह्याने जे वाहन दिसेल ते फोडण्यास सुरुवात केली.
अचानक घडलेल्या प्रकारमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले. तात्काळ घराचे दरवाजे बंद झाले.हे गावागुंड परिसरातून गेल्यानंतर नागरिक घरातून बाहेर आले.
बाहेर आल्यानंतर अनेकांच्या वाहनांच्या काचा फोडल्या, गाडीवर कोयत्याने मारहाण केल्याने कोचे पडले, रिक्षाच्या काचा फोडल्या. झालेले नुकसान बघूनही अनेकांनी पोलिसात तक्रार देणे टाळले.
आज तक्रार दिली तर हे गावगुंड पुन्हा येतील आणि आपला काट धरून आपल्याला पुन्हा मारहाण करतील या भीतीने अनेकांनी पोलीसात तक्रार देणेदेखील टाळले असल्याचे वास्तववादी चित्र समोर आले आहे.
सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता ह्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच शिल्लक राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत असून या गावगुंडांना राजकीय पाठबळ असल्याचे देखील नागरिकांमधून दबक्या आवाजाने बोलले जात आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी आता सिडकोत जातीने लक्ष घालून या गावगुंड्यांचा कंबरड मोडायला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून नागरिक दहा साडेदहा वाजेच्या सुमारास घराबाहेर बसलेले असताना असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सिडकोत पुन्हा एकदा विविध गॅंग तयार होत असून वर्चस्ववादातून असे प्रकार वारंवार घडत तर नाही ना प्रश्न सिडकोवासियांमधून उपस्थित करण्यात आला आहे.