नाशिक (प्रतिनिधी): मित्रांसोबत सहलीला जाणं नाशिक येथील महाविद्यालयीन तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. वैतरणा धरणावर मित्रांसह सहलीसाठी गेलेल्या नाशिक येथील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण जगदीश जाधव ( वय २० ) रा. पाथर्डी फाटा नाशिक असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक: सावधान ! पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील गुरुगोविंदसिंग कॉलेजचे आठ ते दहा विद्यार्थी वैतरणा धरण येथे सहलीसाठी गेले होते. त्याठिकाणी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास टेंट करून रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर वैतरणा धरणाच्या पाण्यात उतरुन आंघोळीसाठी गेले होते, मात्र यातील अरुण जगदीश जाधव याला पोहता येत नसल्याने आणि धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी पोहता येत असलेल्या त्याच्यासोबतच्या काही मित्रांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं आणि तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने नाशिकमध्ये तब्बल चार कोटींची फसवणूक
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. आपला मित्र आपल्याला सोडून गेल्याचं समजतात त्याच्यासोबत असलेल्या मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली. सहलीला आलेले असताना मित्रासोबत अघटीत घडल्याने इतर मित्र देखील यावेळी भेदरलेल्या अवस्थेत होते. वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक शहरातील नामांकित महाविद्यालयातील मित्र मौज मजा करण्यासाठी सहलीला गेले. परंतु त्यांच्यासोबत दुर्दैवी प्रसंग घडला आणि एका महाविद्यालयीन तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बिपीन जगताप हे करत आहे.