नाशिक: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार; अवजड वाहतुकीचा बळी
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या अनेक महिन्यांपासून डोकेदुखी असलेल्या वडाळा- इंदिरानगर भागातील अवजड वाहतुकीने सोमवारी (ता.१५) देखील दुपारी बारा वाजता आम्रपाली सागर ढेंगळे (३, रा. सुभाष रोड, देवळालीगाव) या महिलेचा अपघातात बळी घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दुपारी बाराच्या सुमारास डीजीपीनगर मार्गे वडाळा गावातील शंभर फुटी रस्त्याजवळ असलेल्या मदिना चौकातून जाणाऱ्या अवाढव्य चौदा चाकी ट्रकने (केए- ३२- सी- ६०२४) दुचाकीने (एमएच-१५- एचव्ही- ५९७०) पुढे जाणाऱ्या आम्रपाली यांना धडक दिली.
अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तत्काळ अशोका हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. त्या अशोक रुग्णालयातच सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.
दरम्यान अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांना पाठवून अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक गजानन इरान्ना राचेटी (३५, रा. इराण्णा देवी मंदिराजवळ, जवाहर नगर, विळी घरकुल, सोलापूर) यास ताब्यात घेतले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या भागातील नागरिक या अवजड वाहतुकीचा विरोध करत आहेत. यासाठी अनेक आंदोलने झाली असून, विविध स्तरावर निवेदनेदेखील देण्यात आली आहेत. मात्र आजपर्यंत त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
या अवजड वाहतुकीमुळेच या महिलेला जीव गमवावा लागल्याच्या तीव्र भावना येथे जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या. तातडीने या समस्येवर आता मार्ग काढा नाहीतर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडाळा गाव, इंदिरानगर, विनयनगर, साईनाथनगर, कलानगर, पांडवनगरी आदी भागातील नागरिकांनी दिला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790