नाशिकला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा, पत्रकारांना मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमातदेखील हुल्लडबाजी करण्यात आली. दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातदेखील गोंधळ झाला आणि खुर्च्या उलटवण्यापर्यंत प्रकार घडले होते. तरुणांना नियंत्रित न करता आल्याने हा प्रकार घडला होता. आता मंगळवारी हाच प्रकार घडला. त्यामुळे गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिली. नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.
नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था असली तरी कार्यक्रमाला आलेल्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी कोणताच अडथळा नको होता. याचवेळी कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेले दोन्ही पत्रकार हे व्यासपीठाजवळ जाताच तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.
यावेळी हुल्लडबाज तरुणांनी उपस्थित पत्रकारांचे पाय ओढण्यास सुरवात केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांना व्यासपीठावरून पाय धरून खाली ओढण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली. यावेळी इतर उपस्थित तरुणांनी या दोघांना मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून तसेच कॅमेऱ्याचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावेळी बंदोबस्तास असलेले पोलिस मुळात कार्यक्रमाच्या या गोंधळाच्या ठिकाणी नव्हते. व्यासपीठावरून सूचना केल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.