नाशिक (प्रतिनिधी) : शहराने परिसरात चोरट्यांनी थैमान घातल्याच दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कारचालकास मारहाण करून मोबाईल आणि इतर ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटकही केली होती. आता अजून एक असाच प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
राहुल प्रसाद शिवानंदन प्रसाद हे उबेर चालवतात. एका अज्ञात इसमाने भाडेतत्वावर मुंबईहून नाशिकला येण्यासाठी त्यांची गाडी बुक केली होती. त्याप्रमाणे चालकाने अज्ञात इसमाला मुंबईहून नाशिकला सोडले. मात्र नाशिकला पोहोचल्यानंतर उबेर चालकास संशयित प्रवाशाने पाण्यात गुंगीचे औषध दिले.
कार चालकाने पाणी पिल्यानंतर त्याला गुंगी आली आणि याचाच फायदा घेऊन या इसमाने चालकाच्या खिशातील पैशांचे पाकीट आणि मोबाईल फोन चोरून तेथून पळ काढला. या सर्व घटनेची माहिती कार चालकाने भद्रकाली पोलीस स्टेशनला दिली.
याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम नाशिक रोड बस स्थानक येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर ठिकाणी गुन्हे शाखेतील पोलिसांनी सापळा रचत लागलीच त्या इसमाला ताब्यात घेतले. तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शुभम उर्फ स्वदेश दीपक नागपुरे, (वय: २५, मूळ राहणार: साईदर्शन रो हाउसेस, इस्सार पेट्रोल पंपामागे, म्हसरूळ, नाशिक ) असे सांगितले. त्याचप्रमाणे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पुढील तपास करण्यासाठी भद्रकाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.