गाभारा देखभाल दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण नाही; आता “या” दिवशी खुलं होणार सप्तश्रृंगी देवीचं मंदिर !
नाशिक (प्रतिनिधी): मागील 45 दिवसापासून सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी बंद आहे.
उद्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले होणार होते, परंतु अद्यापही काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे.
नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीचं मंदिर घटस्थापनेला खुलं होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर भगवती मूर्तीचे संवर्धन आणि आणि गाभारा देखभाल दुरुस्तीसाठी 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु दीड महिन्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने मंदिर आता पितृपक्षानंतर मंदिर खुले होणार आहे. पुढील तीन दिवस देवीच्या मंदिरात विविध पूजा होणार आहे. संपूर्ण पितृपक्षात 1600 देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान होणार साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेले वणीचे सप्तश्रृंगी देवी मंदिर मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच येथीले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉज, टॅक्सीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मंदिरावरील मार्गावर पुराच्या पाण्यामुळे प्रदक्षिणामार्गाचे नुकसान झाले होते तर काही भाविक देखील जखमी झाले होते. त्यानंतर सप्तशृंगी गडावरील मूर्ति देखभाल कामासाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत या मंदिराची डागडुजी करण्यात येणार होती. त्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार होते.