नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिकरोड परिसरात २ खंडणीखोरांनी गॅंग चालवण्यासाठी पैसे लागतात असे सांगत, भरदिवसा एका बेकरी कारागिरावर कुऱ्हाडीने वार केला. तसेच दुकानातील गल्ल्यातून दीड हजार रोख रक्कम लुटून नेली.
बेकरीचे मालक ऐसानुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) रोजी भरदिवसा दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास २ खंडणीखोरांनी पैसे वसुलीचा प्रयत्न केला. दरम्यान कोयता व कुऱ्हाड या प्राणघातक शास्त्रांचा धाक दाखवत धमकावले. तसेच बेकरी कारागीर अरमान खान याच्यावर कुऱ्हाडीने वार करत जखमी केले. दरम्यान, गल्ल्यातील दीड हजार रुपये देखील लुटले. तसेच बेकरी मालकाला धमकावत पोबारा केला. सदर घटनेने बेकरीतील कामगार घाबरले होते. संशयित आरोपीचे नाव तेजस गांगुर्डे असून, दुसऱ्या साथीदाऱ्याचे नाव समजले नाही. सदर घटना ही नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.