नाशिक (प्रतिनिधी): सुट्यांची मजा घेण्यासाठी जर आपण आता इगतपुरीच्या पर्यटन स्थळांकडे जाणार असाल तर, तुमचा जंगलातील हिंस्त्र प्राण्यांशी सामना होऊ शकतोय..असं आम्ही नाही तर वन विभाग सांगतोय..
नाशिकला अनेक तालुक्यांना निसर्गाची देणगी असल्याने याठिकाणच्या निसर्ग सौंदर्याला अनेक पर्यटक आकर्षित होऊन या ठिकाणच्या अनेक डोंगर, दऱ्या, धबधबे, गड, किल्ले येथे गर्दी करत असतात. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्याची पावसाचे माहेरघर म्हणून देखील ओळख असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई नाशिक आणि इतर ठिकाणांहून देखील पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते. कोरोना मुळे या ठिकाणांकडे जाण्यास बंदी असली तरी चोर मार्गाने पर्यटक येथे जातच असतात.
असे असताना दुसरीकडे मात्र या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ही सर्व पर्यटन स्थळे बंद असल्याने या भागात जंगली हिंस्त्र प्राण्यांचा संचार वाढला असून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी याठिकाणी येताना सावधगिरी बाळगावी यासाठी वनविभागाकडून आवाहन केले जात आहेत. तसे बोर्ड देखील इगतपुरीच्या अनेक पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वन विभागाकडून ठिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे सुट्यांचा आनंद घेण्यासाठी जर आपण इगतपुरीकडे जाणार असाल तर सावध राहा !