रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे, त्यामुळे घेतलेला हा निर्णय…
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात आता रेमडेसिविर इंजेक्शन वितरणाची प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती (सेव्हरिटी) तपासूनच अधिक चिंताग्रस्त प्रकृती असलेल्या रुग्णास प्रथम असे उतरत्या क्रमाने हे इंजेक्शन देण्यात येणार आहे. तसे स्पष्ट आदेश तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिले आहेत.
सर्वच गरजू रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी ही नवी कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन स्थितीसह, एचआरसीटी स्कोर व इतर बाबींची स्थिती दर्शविणारा चार्टच तयार करण्यात आला आहे. या चार्टनुसार रुग्णाची प्रकृती बघून हे इंजेक्शन त्यास दिले जाईल.
दुसऱ्या बाजूने जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या इंजेक्शनची रोजची माहिती इ मेलद्वारे सकाळी ९ वाजेच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावी लागणार आहे. नव्या प्रणाली अंतर्गत इंजेक्शनसाठी प्रथम रुग्णाचे संपूर्ण नाव, फोटोआयडी अर्थात आधार कार्डसह अन्य पुरावे द्यावे लागणार आहेत.
ही संपूर्ण माहिती हॉस्पिटलने संबंधित विक्रेत्याकडे द्यायची आहे. त्यानंतर विक्रेत्यांकडून इंजेक्शनचा थेट रुग्णालयास पुरवठा केला जाईल. मार्करने लिहिणे आवश्यक आहे. ते दिल्यानंतर रिकाम्या बाटलीवरती संबंधित रुग्णाचे नाव जतन करून ठेवावे लागणार आहे.
ही बाटली भरारी पथकाला तपासणीवेळी दाखवणे बंधनकारक आहे. त्यामुळे नेमकी गरज असलेल्या रुग्णाला हे इंजेक्शन उपलब्धतेसाठी मदत होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.