सिडको: भरदिवसा ज्वेलर्स शॉपमधून ७ लाखांच्या साेन्याच्या दागिन्यांची चोरी

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील शुभम पार्क येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सात लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लपांस केली. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील शुभम पार्क, बंदावणेनगर येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी १०.३० च्या सुमारास सद्गुरू अलंकार या सराफी पेढीचे मालक प्रमोद विभांडिक हे नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. त्यानंतर दुकान स्वच्छ करण्यासाठी ते दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यास गेले. त्यापूर्वी शेजारील किराणा दुकानदाराला त्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. तिघांपैकी दोघे किराणा दुकानात तर एकजण ज्वेलरी शॉपमध्ये घुसला. विभांडिक यांनी ठेवलेली बॅग चोरी करत त्यांना सातपूरकडे जाण्याचा पत्ता त्यांनी विचारला. ही बाब दुकानमालकाच्या लक्षात आली व ते तातडीने दुकानाकडे आले असता बॅग लंपास झाल्याचे त्यांना समजले. या बॅगमध्ये तब्बल १५० ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल होता.
घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आपली बॅग पत्ता विचारणाऱ्या इसमानेच गायब केली असल्याचे समजले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.