नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या गुन्हेगारीस आवर घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी शहरातील सातपूर पोलिसानी एकाच वेळी ११ गुन्हेगार तडीपार केले आहेत.
सातपूर पोलीस ठाण्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत १२ गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार १२ पैकी ११ गुन्हेगारांच्या तडिपारीला मान्यता देण्यात आली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत लॉकडाऊन नंतर प्रथमच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी होत चालला असताना गुन्हेगारांसाठी जणू रानच मोकळे झाले आहे. त्यामुळे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारांबरोबरच सोनसाखळी चोर, खंडणीखोर, मटका, जुगारी, सट्टेबाज, वर्चस्वातून टोळीवाद यासारख्या लहान -मोठ्या गुन्ह्यांवर देखील पोलिसांचा वचक बसने आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शहरात शांतता निर्माण करण्यासाठी सर्वच परिसरतील सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे आवश्यक आहे.