पंचवटी: लॉटरी लागल्याचे सांगत भामट्याने लांबवले महिलेचे सोने आणि दुचाकी

नाशिक (प्रतिनिधी): लॉटरीमध्ये सोने जिंकल्याचे सांगून एका फळविक्रेत्या महिलेसह तिच्या शेजारील महिलेचा आणि तिच्या मुलाचा विश्वास संपादन करत दीड तोळे सोने व दुचाकी लांबवल्याचा प्रकार पंचवटीतील चित्रकूट सोसायटीत उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अनिता पवार (रा. दत्तनगर, दिंडोरीरोड) यांच्या तक्रारीनुसार, या महिलेचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. एक अनोळखी इसम फळाच्या गाडीजवळ आला व त्याने नाव व पत्ता विचारत तुम्हाला लॉटरी लागली असून त्यात सोने जिंकल्याचे सांगितले. महिलेच्या मुलास याची कल्पना दिली. तसेच लॉटरी जिंकल्याचे मोबाइलवर दाखवले. विश्वास बसल्याने पवार व त्यांच्या मुलाने बक्षिसाबाबत माहिती घेतली. संशयिताने तुमच्याकडे सोन्याच्या पावत्या असल्यास त्यांच्या झेरॉक्स पावत्या लॉटरी कंपनीला द्याव्या लागतील असे सांगितले.
पवार यांनी पावत्या नसल्याचे सांगितले. संशयिताने सोने दाखवा, त्याचे वजन बघावे लागेल असे सांगितले. महिलेने सोन्याचे दागिने दाखवले तसेच शेजारी राहणाऱ्या साळवे नामक महिलेला लॉटरी लागल्याचे सांगितले. दोन्ही महिलांकडे सोने खरेदीच्या पावत्या नसल्यानेे त्यांनी सोन्याचे दागिने दाखवले. ते घेत त्याचे वजन करावे लागेल असे त्याने सांगितले. महिलेने संशयितावर विश्वास ठेवत मुलाच्या मित्राची दुचाकी (एमएच १५ एफएल ७६३७) दिली. संशयित बराच वेळ झाला तरी न परतल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली.