महत्वाची बातमी: नाशिकला कोरोनाच्या ‘या’ निर्बंधांमध्ये आता शिथिलता: पालकमंत्र्यांची घोषणा
नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत.
तसेच जिल्ह्यातील कमी होणारी ॲक्टिव्ह रूग्णांची टक्केवारी व रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्याही आश्वासक आहे.
शासनाकडून कायमच मोफत स्वरूपात लस मिळेल असे समजू नये, नागरीकांनी शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
आज (दि. ३१ जानेवारी २०२२) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, रुग्ण संख्या १८ हजार ५०० वरून १५ हजार ५०० वर आलेली असून ३ हजाराने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच पॉझिटिव्हीटी दर ४१ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आला आहे. सध्या म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. त्याचप्रमाणे शाळा सुरू झालेल्या असून शाळांमध्ये अद्याप मुले बाधित झालेले नाहीत. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9861,9864,9867″]
यासोबतच मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वायंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगाव मध्ये लसीकरण कमी असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले.
खुल्या पर्यटन स्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असून मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे बंधने कायम राहतील. सशुल्क प्रवेशाची बंदिस्त पर्यटन स्थळे मात्र शासन अधिसूचना सुधारित होईपर्यंत बंदच राहतील. विद्यार्थ्यांची अडचण होत असून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाकडून आजच घेण्यात आलेला आलेला आहे, त्यादृष्टिने सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर कार्यवाहक करण्याचेही आवाहन यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.